राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे. पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. 15 मार्च ते 18 मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीट पडण्याची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 16 तारखेला राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 4 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस व गारपिट होणार आहे. दरम्यान, मुंबई ते गडचिरोली आणि कोल्हापूर ते नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.