राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांवर पुढील दोन आठवडे कोणतीही कारवाई न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला आदेश दिले आहेत. त्यामुळे मुश्रीफांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. मुश्रीफ यांना पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यासोबतच त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज करण्याच्याही सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
एका साखर कारखाना घोटाळा प्रकरणी मुश्रीफांना ईडीने समन्स बजावले होते. त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर ईडीने छापेमारी केली होती. गेल्या दीड महिन्यातील ही दुसरी छापेमारी होती. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर मुश्रीफ यांनी कोर्टात धाव घेतली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवडे कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.