गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा दराचा मुद्दा विधिमंडळात विरोधी पक्षांनी चांगलाच लावून धरला होता. यावर आता केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारनं कांदा खरेदीबाबत बाजारात तत्काळ हस्तक्षेप करण्याचे नाफेड आणि नॅशनल कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला निर्देश दिले आहेत.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, नाफेडने ताबडतोब 24 फेब्रुवारी 2023 पासून खरेदी सुरू केली. मात्र गेल्या दहा दिवसात शेतकऱ्यांकडून 900 रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दराने सुमारे 4000 मेट्रीक टन कांद्याची थेट खरेदी केल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडने 40 खरेदी केंद्रे उघडली आहेत. त्यामुळे तिथे शेतकरी त्यांचा कांदा विकू शकतात.
नाफेडने खरेदी केंद्रांवरुन दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बंगळुरु, चेन्नई, हैदराबाद आणि कोची या ठिकाणी साठा नेण्याची व्यवस्थाही केली आहे. यावर्षी ग्राहक व्यवहार विभागाने 2.5 लाख मेट्रिक टन अतिरिक्त साठा म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://www.spreaditnow.in