राज्यातील सत्तासंघर्षावर केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे. मोठा धक्का बसताच आज उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाची बैठक बोलावली आहे. आयोगाने निर्णय देताच अनेक वेगवान राजकीय घडामोडी राज्यात घडल्या.
राज्यात काय-काय घडामोडी घडल्या?
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर जल्लोष केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण मिळाल्यानंतर आणखी काही बदल केले आहेत.
निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, बंदरे आणि खणिकर्म मंत्री दादा भुसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, रोहयो मंत्री संदीपान भुमरे या सगळ्यांनी त्यांचं सोशल मीडियावरील प्रोफाईल पिक्चर हे धनुष्यबाण केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चर तर बदललाच पण त्यांनी एक ट्विट करत आनंद दाखवला आहे, त्यांनी, ” निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आम्ही नम्रपणे स्वीकारतो. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा होत असेल तर ती आम्ही पाहत राहू शकत नाही. शिवसेना आता योग्य मार्गावर वाटचाल करेल असे वचन आम्ही सर्व मावळे तमाम जनतेला देतो. या निर्णयासोबतच येणाऱ्या जबाबदारींचे भान आम्हाला आहे. त्यामुळे विचारांचा हा वारसा जपत आणि ‘शिवसेना’ या चार अक्षरी मंत्रासाठी पुन्हा एकदा सर्वस्व अर्पण करत संघर्ष करण्याची नवीन ऊर्जा आणि बळ आम्हाला मिळाले आहे”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in