नाशिक पदवीधरमध्ये सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस होती. गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचं दिसत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्य नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून बाळासाहेब थोरात हे अनेक दिवसांपासून नाराज होते. नाशिक विधान परिषद निवडणुकीत थोरात कुटुंबाविरोधात खूप मोठं राजकारण झालं, असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता. याचं कारणास्तव थोरात यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. मात्र आता याबाबत दिल्ली हायकमांड काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना विचारण्यात आले. मात्र नाना पटोले यांनी थोरात यांच्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण दिल आहे. आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा मी सदिच्छा देतो. आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही. माध्यमं काँग्रेसबाबत फार चिंता करत आहेत. असं नाना पटोले म्हणाले.