देशात गव्हाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गव्हाबरोबरच पिठाच्या किंमतीतही मोठी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत पिठाच्या किंमतीत 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. अशातच गव्हाच्या किंमतीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारात गव्हाच्या पिठाची किंमत 34 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे. सध्या बाजारात गहू 3 हजार 200 ते 3 हजार 300 रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. त्यामुळं केंद्र सरकारने खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत आणि पिठाच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.
अन्न धान्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने पावले उचलत आहे. अशातच सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसू नये यासाठी गव्हाचे दर लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आहे. गव्हाच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता एक मोठे पाऊल उचलले आहे. 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजार विक्रीसाठी आणला जाणार आहे.