राष्ट्रवादीची स्वबळावर तयारी, महाविकास आघाडीत फूट?
पुरंदर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत फूट पडल्याची दिसत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने या दोन्ही निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राष्ट्रवादीने माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांची विधानसभेचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झालेली दिसत आहे.
मंदाकिनी खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर
राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना दिलासा मिळाला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना 2016 च्या कथित पुणे जमीन व्यवहार प्रकरणात 1 लाख रुपयांच्या जामिनावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मंदाकिनी खडसे यांचे वकील मोहन टेकवडे यांनी ही माहिती दिली आहे.
हवामान विभागाने या राज्यांना दिला पावसाचा इशारा
हवामान विभागानं उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावासाचा इशारा दिला आहे. तसेच काही ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पावसाचा इशारा दिला आहे.
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्र्याच्या दाव्यानं सर्वत्र खळबळ
अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये बालाकोट येथे भारतानं सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत होता, असा दावा अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी केला आहे. या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
भारत वनडे रँकिंग मध्ये नंबर वन..!
भारतीय क्रिकेट संघाने काल (ता. 24 जाने.) न्यूझीलंडविरुद्धच्या इंदौर येथील अखेरच्या वनडे सामन्यात शानदार विजय मिळवला आणि मालिका 3-0 ने जिंकली. त्यामुळे भारत वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे. भारताने हा तिसरा वनडे सामना 90 धावांनी जिंकला. या सामन्यात रोहित शर्मा (101) आणि शुभमन गिलने (112) शतक ठोकले आणि टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही शानदार खेळ केला. दरम्यान भारताने 385/9 धावा तर न्यूझीलंडचा संघ 295/10 धावाच करू शकला.