राज्यातील 520 हवालदार होणार पोलीस उपनिरीक्षक
राज्यातील 520 पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना संवर्ग न मागितल्यामुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. परंतु, आता पोलीस महासंचालकांनी सकारात्मक पाऊल उचलले असून निवड झालेल्या हवालदारांची माहिती मागवण्यात आली आहे.
आज शिवसेना-वंचित युतीची घोषणा
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती होणार असल्याची घोषणा करण्यात येणार आहे. तसे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या वतीनं आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आले आहेत.
इस्रायलमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार मंत्र्याची हकालपट्टी
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळातील आरोग्यमंत्री आर्येश देरी यांना पदावरून दूर केले. या मंत्र्याला पदावरून हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यामुळे न्यायालयाच्या अधिकारांबाबतचे मतभेद आणखी तीव्र झाले आहेत.
संदीप देशपांडे बीएमसीमधील कथित घोटाळ्याचा पुराव्यांसह गौप्यस्फोट करणार
कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. पण मनसेचे नेते संदीप देशपांडे आज पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसहित कथित भ्रष्टाचार बाहेर काढणार आहेत. यावेळी स्क्रीनवर भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केले जाणार आहेत.
भारत विश्वचषकातून बाहेर
ओडिशा येथील भुवनेश्वर येथे खेळल्या जात असलेल्या 2023 हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. या पराभवानंतर भारतीय संघ 2023 च्या विश्वचषकातून बाहेर झाला आहे. शूटआऊटमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.