नाशिकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे या भागात ट्रक आणि खासगी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एकूण 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 30 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात दोन पुरुष, सहा महिला तर दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या अपघातात खासगी बसमध्ये 35 ते 45 प्रवासी प्रवास करत होते. यातील पंधरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिन्नर येथील खासगी तसेच शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
या अपघाताची बातमी कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. अपघाताचे भीषण स्वरुप पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केली आहे. आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. मात्र पोलीस आणि बचावपथकाच्या माध्यमातून ही वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.