नववर्ष अर्थात 2023 ला आजपासून सुरुवात झाली.. मात्र, गेल्या काही वर्षांतील घटनांचे पडसाद या नव्या वर्षातही जाणवणार आहेत. 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध, कोरोनामुळे जगभर मंदीची सावट होते. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना अगदी हैराण करून सोडले. नव्या वर्षातही सामान्य जनतेला महागाईचे चटके बसण्याची शक्यता आहे.
2023 च्या पहिल्या जानेवारी महिन्यापासूनच विविध क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे. नवीन वर्षात अनेक क्षेत्रांमध्ये नवे नियमही लागू केले जाणार आहेत. त्यामुळे उत्पादनांच्या किमती वाढणार असून, सर्वसामान्यांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. कोणत्या क्षेत्रात बदल होणार हे जाणून घेऊ या..
कशासाठी जादा पैसे लागणार..?
विमा पॉलिसीचे प्रीमियम वाढणार
1 जानेवारी 2023 पासून कोणत्याही प्रकारची विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी केवायसी अनिवार्य केली आहे. यांसह विमा कंपन्या केवायसीसाठी प्रक्रिया शुल्क लागू करू शकतात. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या विमा पॉलिसीचा प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन महागणार
नवीन वर्षापासून फोन कंपन्यांना आपल्या सर्व आयात-निर्यात स्मार्टफोनची नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे कंपन्यांवर नोंदणी शुल्काच्या रूपाने बोजा वाढणार आहे. परिणामी, स्मार्टफोनच्या किमती वाढू शकतात.
कारच्या किमती वाढतील
टाटा मोटर्स, एमजी मोटर, मारुती सुझुकी, ह्यू मोटर्स कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. खर्च वाढल्याने वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे मानले जात आहे. नवीन वर्षात चारचाकी वाहनांसह इतर वाहनांच्या किमती वाढू शकतात.
इलेक्ट्रिक वाहनांची दरवाढ
सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या गुणवत्तेबाबत बॅटरी उत्पादनासाठी नवीन मानके निश्चित केली आहेत. सेल, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, आणि बॅटरी पॅक स्तरांवर बदल होणार असून, खर्चात वाढ होईल. परिणामी ईव्हीची किंमत 10 ते 15 टक्क्यांनी वाढू शकते.
क्रेडिट कार्ड पेमेंटवर प्रक्रिया शुल्क
एसबीआयने क्रेडिट कार्ड व्यवहारांवर प्रक्रिया शुल्क सुधारित केले आहे. बँकेने सर्व व्यापारी ईएमआय व्यवहारांवरील प्रक्रिया शुल्क 199 रुपये + लागू कर केले आहे. भाडे देयक व्यवहारांवर 99 रुपये + लागू कर प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे.