नववर्ष अर्थात 2023 सुरु होण्यास अवघे काही तास उरले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी सारे सज्ज असताना, हे पहिल्याच जानेवारी महिन्यात सरकारी नोकरदारांपासून तर थेट शेतकऱ्यांपर्यंत महत्वाचे निर्णय होणार आहेत. नवीन वर्षाच्या या पहिल्याच महिन्यात नेमक्या कोणत्या घोषणा होऊ शकतात, याबाबतचा हा खास आढावा..
जानेवारीत होणाऱ्या संभाव्य घोषणा
शेतकऱ्यांना 13 वा हप्ता
देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 13 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. केंद्र सरकार दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करीत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2022 रोजी पीएम-किसान योजनेचा 10 वा हप्ता जारी केला होता. त्यामुळे सरकार यंदाही 1 तारखेलाच 13 वा हप्ता वर्ग करणार का, याकडे लक्ष लागले आहे.
महागाई भत्ता वाढणार..
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यात महागाई भत्ता म्हणजेच डीएची घोषणा होते. मात्र, भत्त्याची मोजणी जानेवारीपासूनच सुरू होते. नंतर थकबाकीच्या स्वरूपात भत्ता मिळतो. जानेवारी ते जून या सहामाहीसाठी, 4 टक्के दराने महागाई भत्ता वाढविला जाऊ शकतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळतो. आता तो 42 टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
पेन्शन वाढणार
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 29 डिसेंबर रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जास्त पगाराचे योगदान दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी ईपीएसमध्ये 5000 रुपये किंवा 6500 रुपयांच्या पगार मर्यादेपेक्षा जास्त पेन्शनसाठी दिले, त्यांनाच हा लाभ मिळेल.