भारतीय संघाचा स्टार बॅट्समन, माजी कॅप्टन विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून आपला फाॅर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यातही टी-20 क्रिकेटमध्ये त्याचा बॅटमधून धावा निघणंच बंद झालंय.. दुसरीकडे आगामी टी-20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआय नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहे. अशातच विराटने नुकताच एक मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर येत आहे.
टी-20 क्रिकेटमधून ब्रेक
नवीन वर्षात टीम इंडियाला घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-20 व वन-डे मालिका खेळायची आहे. येत्या 3 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार असून, लवकरच त्यासाठी भारतीय संघ जाहीर होऊ शकतो.. मात्र, त्याआधीच विराटने टी-20 क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. सध्या तरी तो फक्त वन-डे व कसोटी फाॅरमॅटवरच लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते..
‘बीसीसीआय’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या वृत्तास दुजाेरा दिला. त्यांनी सांगितले, की श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी विराटला विश्रांती हवी असल्याचे त्याने कळवले आहे. वन-डे मालिका मात्र तो खेळणार आहे. टी-20 क्रिकेटमधून त्याने ब्रेक घेतला की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, तो महत्वाच्या मालिकांसाठी प्लॅन करीत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॅप्टन रोहित शर्मा याच्याबाबत बोलायचं झालं, तर आम्ही रोहितच्या दुखापतीबाबत घाई करणार नाही. त्यामुळे तो फिट आहे की नाही, याबाबत आम्ही आताच काही ठरवणार नाही. तो फलंदाजी करतोय, मात्र आम्हाला फिल्डिंगमध्ये कोणताही धोका पत्करायचा नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
थेट आयपीएलमध्येच उतरणार
खरं तर श्रीलंकेविरूद्ध टी-20 मालिकेसाठी विराटला विश्रांती दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्याआधीच विराटनेच तो टी-20 क्रिकेटपासून काही काळ लांब राहणार असल्याचे सांगण्यात आलंय. आयपीएल-2023 पर्यंत तो भारताकडून टी-20 खेळणार नाहीये. मात्र, याबाबत त्याने बीसीसीआयला अद्याप काहीही सांगितले नसल्याचे समजते.
विराटच्या जागी भारताचा अंडर-19 टीमचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार यश धुळ याचं नाव चर्चेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये यशने चांगली कामगिरी केलीय. आपल्या कामगिरीच्या जोरावर त्याने भारत ‘अ’ संघातही स्थान मिळवलं. सय्यद मुश्ताक अली मालिकेतही तो चमकला होता. त्यामुळे विराटच्या जागी त्याला संधी दिली जाणार असल्याचे बोलले जाते..