राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याबाबत ‘सीबीआय’ने दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय.
सुप्रिम कोर्टात सुनावणी नाही
मुंबई हायकोर्टाने 12 डिसेंबरला अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला होता. त्याविरोधात ‘सीबीआय’ने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, पण सर्वोच्च न्यायालयाला सध्या नाताळाच्या सुट्ट्या असल्यानं ‘सीबीआय’च्या याचिकेवर सुनावणी झाली नाही.
मुंबई हायकोर्टाने जामीनाला दिलेली 10 दिवसांची वाढीव स्थगितीची मुदत आज संपली. मुंबई हायकोर्टाने ‘सीबीआय’ला पुन्हा मुदतवाढ देण्यास नकार दिल्याने देशमुख यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
अनिल देशमुख यांना आज जामीन मंजूर झाल्यास, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ते सहभागी होण्याची शक्यता आहे. देशमुख बाहेर येणार असल्याने राष्ट्रवादीत आनंदाचे वातावरण आहे.