‘इंडियन प्रीमियर लिग’ अर्थात आयपीएल-2023 साठी नुकतीच मिनी ऑक्शन पार पडले. जगभरातील क्रिकेट रसिक या सर्वात मोठ्या स्पर्धेची वाट पाहत असताना, ‘आयपीएल’च्या नियोजनावर संक्रात कोसळल्याचे दिसत आहे. त्याला कारण ठरलाय, ‘आयसीसी’चा नियम.. त्यामुळे ‘आयपीएल’चे वेळापत्रक बदलण्याची वेळ ‘बीसीसीआय’वर आली आहे.
आयपीएलचा यंदाच्या हंगामास 1 एप्रिल 2023 पासून सुरुवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा यंदा 74 दिवस चालणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने पूर्वीच स्पष्ट केलेय, पण ‘बीसीसीआय’ आता ‘आयपीएल’च्या वेळापत्रकात बदल करावा लागणार आहे.
नेमकं कारण काय..?
बीसीसीआयच्या नियोजनानुसार, 1 एप्रिल ते 13 जूनपर्यंत आयपीएल होणार आहे. दुसरीकडे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल 7 जूनला खेळवली जाणार आहे. मात्र, कोणत्याही दोन स्पर्धांमध्ये किमान 7 दिवसांचा बफर वेळ असावा, असा ‘आयसीसी’चा नियम आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’ला 31 मे पर्यंत आयपीएल संपवावी लागणार आहे.
आयसीसीच्या या नियमामुळे बीसीसीआयला आयपीएलसाठी 14 दिवस कमी पडत आहेत. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे वेळापत्रक पुन्हा बदलावे लागणार आहे. भारतीय संघ विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यास, या वेळापत्रकात मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ असल्याचे समजले जाते.
‘आयपीएल’च्या वेळापत्रकात बीसीसीआय नेमका काय बदल करते, तसेच 14 दिवसांचे सामने कधी खेळवते, याची उत्सुकता चाहत्यांना असणार आहे. त्यामुळे आयपीएलचे वेळापत्रक कधी जाहीर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.