राज्यावर पुन्हा वीज दरवाढीचे संकट निर्माण झाले आहे. महावितरण व महानिर्मिती कंपन्यांची अकार्यक्षमता, वीजचोरी व खासगी कंपन्यांकडून जादा दराने होणारी वीज खरेदी, यामुळे 75 पैसे ते 1 रुपया 30 पैसे प्रति युनिट दरवाढ होऊ शकते.
मार्च-2023 पर्यंत निर्णय
वीज दरवाढीसाठी महावितरणने याचिका दाखल केली असून, राज्याच्या 6 महसूल विभागात त्यावर सुनावणी होईल. त्यानंतर मार्च-2023 पर्यंत दरवाढीचा निर्णय होईल, अशी माहिती राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.
विजेची गळती 14 टक्के असल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात 30 टक्क्यांहून अधिक गळती आहे. ही गळती म्हणजे वीजचोरीच आहे. कृषिपंपांचा वीज वापर 15 ऐवजी 30 टक्के दाखवून ही चोरी लपवली जात असल्याचे ते म्हणाले.
20 हजार कोटींचा तोटा
कोरोना काळात 2020-21 व 2021-22 या दोन वर्षांत कंपनीचा 20 हजार कोटींचा तोटा झाला. तसेच, अदानी पॉवर कंपनीला 2018-19 ते 2022-23 पर्यंतचाही फरक द्यावा लागणार आहे. त्यामुळे किमान 75 पैसे ते 1 रुपये 30 पैसे प्रतियुनिट दरवाढ केली जाणार असल्याचे होगाडे म्हणाले.