दहावीच्या विद्यार्थ्यांना कला व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल सवलतीचे गुण दिले जातात. सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांना शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव दाखल करावे लागतात.
अतिरिक्त सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना आता पैसे मोजावे लागणार आहेत. प्रस्ताव दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून 50 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.
कशामुळे शुल्क आकारणी..?
गेल्या काही वर्षात कला, क्रीडा प्रकारांतील सहभागी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव वाढले आहेत. त्यात त्रुटी आढळल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा लागतो.
अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जादा कर्मचारी विभागीय मंडळ स्तरावर घ्यावे लागतात. अर्जांच्या छाननीसाठी वेळ, श्रमाचा विचार करुन प्रति विद्यार्थी 50 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.