भारत व न्यूझीलंडमध्ये तिसरा व अखेरचा वन-डे सामना बुधवारी (ता. 30) क्राइस्टचर्च येथे होणार आहे. पहिला सामना न्युझीलंडने जिंकला, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. भारतासाठी तिसरा सामना महत्वाचा असतानाच, धक्कादायक बातमी समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून न्युझीलंडमध्ये पावसाने कहर केलाय. त्यामुळे टी-20 मालिकेतही एकाच सामन्याचा निकाल लागला. आता वन-डे मालिकेलाही पावसाचा फटका बसत आहे.
पावसाचे सावट कायम
मालिकेतील तिसऱ्या वन-डेवरही पावसाचे सावट कायम आहे. न्यूझीलंडच्या वेळेनुसार दुपारी 2 वाजता, तर भारतीय वेळेनुसार, हा सामना सकाळी 7 वाजता सुरु होणार आहे, पण सामन्याच्या वेळी क्राइस्टचर्चमध्ये 70 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
न्युझीलंडने पहिला सामना जिंकला असल्याने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. दुसरा सामना रद्द झाल्याने मालिका जिंकण्याच्या भारताच्या आशा संपल्या असल्या, तरी किमान तिसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.