ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दीर्घ आजाराने निधनाने झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु असताना, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मधुमेहाचा त्रास
विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. तसेच, पोटात पाणी झाल्यानं त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या निधनाची अफवाही पसरली होती.
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. अनेक मराठी, हिंदी सिनेमा, मालिकांसह रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. अनेक आव्हानात्मक भूमिका त्यांनी साकारल्या.
अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनदेखील केलं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ सिनेमाचं समीक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. ‘अनुमती’ या 2013 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.