मुंबई व परिसरात त्या दिवशी थरारक, भीतीदायक घटना घडली होती, आज तिला 14 वर्षे पूर्ण होत आहे. आजच्याच दिवशी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत अजमल कसाब व त्यांच्या गँगने अतिरेकी हल्ला केला होता. समुद्रमार्गे आलेल्या अतिरेक्यांनी हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय आपल्या ताब्यात घेतले होते. या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता व 700 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
आजही 26/11 मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत. या हल्ल्यात कर्तव्य बजावणारे हेमंत करकरे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे व इतर अनेक पोलिस अधिकारी शहीद झाले होते. या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता. यामुळे जगभर या हल्ल्याची चर्चा झाली होती.
पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज, नरिमन हाऊसवर कब्जा मिळवत इतर काही प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्येही हल्ला चढवला होता. दहशतवाद्यांच्या या अंदाधुंद गोळीबारामध्ये सर्वाधिक मृत्यू छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे झाल्याने तिथे अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता तर हॉटेल ताजमध्ये जवळपास 31 जणांचा मृत्यू झाल्याने लोकांमध्ये भीती पसरली.
जवळपास 60 तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु असताना हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक पोलीस कर्मचारी देशासाठी शहीद झाले. 10 दहशतवाद्यांपैकी अजमल कसाब याला तुकाराम ओंबळे यांनी आणि संजय गोविलकर, भास्कर कदम, हेमंत बावधनकरसह 16 पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी जिवंत पकडला. तुकाराम ओंबळे अंगावर गोळ्या लागल्याने नंतर शहीद झाले. अखेर 21 नोव्हेंबर 2012 रोजी सकाळी साडेसात वाजता कसाबला पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 https://www.spreaditnow.in