राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. आत्मघातकी स्फोट घडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचे गुप्तचर विभागाला समजले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिवाला मोठा धोका असल्याचे समोर आल्यानंतर गुप्तचर यंत्रणेसह पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली असून, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आता आणखी वाढ केली जाणार आहे. तशा प्रकारच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले..
यापूर्वीही अनेकदा धमक्या…
शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केल्यापासून मुख्यमंत्री शिंदे हे चर्चेत आले आहेत. महिनाभरापूर्वीच त्यांना जिवे मारण्याचे पत्र मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी धमकीचा फोनही आला होता. महाविकास आघाडी सरकारमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही नक्षलवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या जिवाला धोका असून, त्यांना आत्मघातकी स्फोट घडवून त्यांना जिवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत आता आणखी वाढ केली जाणार आहे. तसेच, त्यांचे निवासस्थान व त्यांच्या कुटुंबीयांचीही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच ‘पीएफआय’ (PFI) संघटनेवर बंदी घातली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याचे जोरदार समर्थन केले होते. त्यामुळे त्याचा या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचाही तपास मुंबई पोलिस करीत आहेत.
दरम्यान, मुंबईतील ‘बीकेसी’ मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. पोलिसांनी या मैदानास सुरक्षेची पूर्ण तयारी केली जाणार असून, दसरा मेळाव्याच्या स्टेजवर काही मोजकेच लोक असतील, असं सांगण्यात येतंय..