SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गडकरींची मोठी घोषणा, चार चाकी महागणार…?

प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा नुकताच रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता. 29) एक मोठा निर्णय जाहीर केला..

गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सर्व कारमध्ये सहा एअरबॅग्ज बंधनकारक करण्यात आलं आहे. खरं तर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याआधीच हा निर्णय जाहीर करताना, येत्या 1 ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे..

Advertisement

याबाबत गडकरी म्हणाले, की कार उत्पादक कंपन्यांना तयारी करण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे. त्यानुसार, 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व कारमध्ये कंपन्यांना 6 एअरबॅग्ज द्याव्या लागणार आहेत. त्यासाठी ‘एम-1’ ही पॅसेंजर कारची ‘कॅटेगरी’ ठरविली आहे. ‘ग्लोबल चेन’मध्ये समस्या येत असल्याने, ऑटो कंपन्यांना एक वर्षाची मुदत दिली आहे.

2020 मध्ये झालेल्या कार अपघातात 13,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. कारमध्ये 6 एअरबॅग्ज असत्या, तर या लोकांचे प्राण वाचू शकले असते, असेही गडकरी म्हणाले..

Advertisement

कार महागणार…?

सध्या देशात कारमध्ये दोन एअरबॅग्जची सक्ती आहे. त्यात आता आणखी चार एअरबॅग्जची भर पडणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाला ऑटो कंपन्यांनी सुरुवातीपासून विरोध केला आहे. या निर्णयामुळे कारच्या किंमती 50 ते 60 हजार रुपयांनी वाढणार असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र, संसदेत बोलताना गडकरी यांनी कंपन्याचा हा दावा फेटाळून लावला होता.

Advertisement

एका एअरबॅग्जची किंमत 800 रुपये आहे. कारमध्ये 4 एअरबॅग्ज वाढवल्यास कारची किंमत 5200 रुपयांनी वाढू शकते. मग कंपन्या 60 हजार रुपयांनी कारच्या किमती वाढतील, असे कसे सांगू शकतात, असा सवाल गडकरी यांनी केला होता.

केंद्र सरकारने आता कारमध्ये 6 एअरबॅग्जची सक्ती केली असून, पुढील वर्षी 1 ऑक्टोबरपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच, सरकारने ‘सीटबेल्ट’ वापरणंही सक्तीचं केलं आहे. ‘सीट बेल्ट रिमाईंडर ब्लॉकर’वरही सरकारने बंदी आणल्याची माहिती नुकतीच गडकरी यांनी दिली होती..

Advertisement

📣 आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉 spreaditnow.in

Advertisement