मंत्रालयात नाेकरीला लावण्याचे आमिष दाखवून एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ‘सैराट’ सिनेमात ‘प्रिन्स’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सूरज पवार याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस शोध घेत असतानाच, सूरज पवार शुक्रवारी (ता. 23) सायंकाळी स्वत:हून वकिलासह राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाला.
राहुरी पोलिसांनी तब्बल 6 तास सूरजची कसून चौकशी केली. त्यानंतर सोमवारी (ता. 26) पुन्हा एकदा त्याला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिस चौकशीत सूरज पवारचा या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास, त्याला अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली..
नेमकं प्रकरण काय..?
याबाबत महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा, ता. नेवासा, जि. अ.नगर) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी वाघडकर यांच्याकडून 5 लाखांची मागणी केली होती.. नोकरी लागल्यावर तीन लाख व सुरुवातीला दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, पैसे देण्यापूर्वीच महेश वाघडकर यांना संशय आल्याने त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.
महेश वाघडकरच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणूक करणे, बनावट शिक्के व दस्तऐवज तयार करणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. आतापर्यंत या प्रकरणात दत्तात्रेय क्षीरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे व ओमकार तरटे (दोघेही रा. संगमनेर), तसेच विजय बाळासाहेब साळे (वय 37, रा. खडांबे बु. ता. राहुरी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनीच सूरज पवार याचेही नाव घेतले. आरोपींच्या या टोळीने आतापर्यंत राहुरी, श्रीरामपूर, नेवासा तालुक्यासह व नाशिक जिल्ह्यातील अनेक तरूणांना नोकरीच्या आमिषाने लाखो रुपयांना गंडा घातल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात ‘सैराट’ चित्रपटातील ‘प्रिन्स’ची भूमिका साकारणाऱ्या सूरज बेलगंग्या पवार (वय 22, रा. कात्रज, जि. पुणे) यालादेखील आरोपी करण्यात आले आहे. पोलिस पथक त्याच्या मागावर असतानाच, 23 सप्टेंबरला दुपारी साडेचार वाजता तो स्वतःहून वकिल दीपक शामदिरे यांच्यासोबत राहुरी पोलिस ठाण्यात हजर झाला.
राहुरी पोलिसांकडून रात्री उशीरापर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात आली. जबाब नोंदवून घेतल्यावर त्याला सोडून देण्यात आले. तसेच त्याला पुन्हा सोमवारी पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत नोटीस बजावल्याची माहिती पोलिसांनी दिली.