‘सैराट’ सिनेमात ‘प्रिन्स’ची भूमिका साकारणारा अभिनेता सूरज पवार चांगलाच अडचणीत सापडला आहे. मंत्रालयात नाेकरीला लावण्याचे आमिष दाखवून अहमदनगरच्या नेवासे तालुक्यातील एकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सूरज पवार याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा, ता. नेवासा, जि. अ.नगर) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी दत्तात्रेय क्षीरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे व ओमकार तरटे (दोघेही रा. संगमनेर) या तिघांना अटक केली आहे. या आरोपींनीच सूरज पवारबद्दल माहिती दिली. त्यामुळे राहुरी पोलिस लवकरच सूरजलाही अटक करणार असल्याची माहिती मिळाली..
महेश वाघडकर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध फसवणूक करणे, बनावट शिक्के व दस्तऐवज तयार करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने 19 सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. पाेलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी ही माहिती दिली..
नेमकं प्रकरण काय..?
फिर्यादी महेश वाघडकर यांना 3 सप्टेंबर रोजी फोन आला. फोनवर समोरच्या व्यक्तीने असं सांगितलं, की ‘आपण श्रीरंग कुलकर्णी असून, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालयातून बोलत आहे. आमच्या विभागातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सहायक कक्षाधिकारी पदाच्या जागा भरायच्या आहेत. तुम्ही इच्छुक असल्यास, पाच लाख रुपये द्यावे लागतील.’
‘काम होण्यापूर्वी दोन लाख व ऑर्डर हातात पडल्यावर तीन लाख रुपये द्या. नोकरीच्या आशेने वाघडकरांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली. ठरल्याप्रमाणे 4 सप्टेंबर 2022 रोजी राहुरी बसस्थानकात या दोघांमध्ये तोंडी करार झाला व पहिल्या टप्प्यात 2 लाख रुपये देण्यात आले.. दोन दिवसांनी तुमचे नियुक्तीपत्र राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ, असे त्याने सांगितले.
श्रीरंग कुलकर्णी 9 सप्टेंबरला राहुरी विद्यापीठ येथे आला. त्यावेळी वाघडकर हेही उर्वरित तीन लाख रुपये घेऊन गेले. मात्र, त्यावेळी वाघडकरांना त्याचा संशय आला. श्रीरंग कुलकर्णी याने फसवणुक केल्याचे लक्षात आल्यावर रक्कम न देता, राहुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस तपासात श्रीरंग कुलकर्णी नावाची कोणतीही व्यक्ती मंत्रालयात नसून, ती व्यक्ती दत्तात्रेय अरुण क्षीरसागर (रा. नाशिक) असल्याचे स्पष्ट झाले.
बनावट ऑर्डर व ओळखपत्र बनविण्यासाठी बनावट शिक्के व कागदपत्रे तयार करण्याचे काम आरोपी आकाश विष्णू शिंदे व ओमकार नंदकुमार तरटे (रा. संगमनेर) यांनी केल्याचे समोर आले.. पोलिसांनी त्यांच्या दुकानावर छापे घालून दोघांना अटक केली..
प्रिन्सचा काय संबंध..?
काही दिवसांपूर्वी ‘प्रिन्स’ सूरज पवारदेखील संगमनेरात आला होता. त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्या आरोपींना भेटून एका कामासाठी हे शिक्के लागत असल्याचे सांगितले. तसेच प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशीही बोलणे करून दिल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींनी भारताच्या बनावट राजमुद्रा तयार करुन त्याचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणात मोठ्या रॅकेटची शक्यता असल्याचे समोर येत आहे. राहुरीचे पोलिस लवकरच सूरज पवारला अटक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.