रस्त्यांची उभारणी करण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जाताे. त्यासाठी या क्षेत्रातील कंपन्या बँकांकडून कर्ज घेतात. नंतर बॅंकांचे हे कर्ज फेडण्यास कंपन्यांना अनेक वर्षे लागतात. टोलवसुलीच्या माध्यमातून हा पैसा वसूल केला जातो.. तो संबंधित कंपन्यांच्याच घशात जातो… त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा उपाय सूचवला आहे..
सामान्य नागरिकांनाही आता टोलवसुलीतून (Toll plaza) पैसा कमावण्याची (earn money) संधी मिळणार आहे.. विशेष म्हणजे, ही टोलवसुली सरकार करणार असून, कमाई मात्र सामान्य नागरिकांची होणार आहे.. मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांनी नुकताच एका मुलाखतीत आपला हा ‘मास्टर प्लॅन’ सांगितला.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…
कशी होणार कमाई..?
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या धोरणानुसार, देशभरातील रस्ते बांधणीचा पैसा सामान्य नागरिकांकडून गोळा केला जाणार आहे.. ‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ (InvITs) मार्फत सामान्य नागरिकांना हा पैसा गुंतवण्याची संधी दिली जाणार आहे.. या गुंतवणुकीवर लोकांना व्याज दिलं जाईल, असा हा प्रस्ताव असल्याचे गडकरी यांनी सांगितलं..
‘इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ हे म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट गुंतवणूक ट्रस्टसारखे असते.. पायाभूत सुविधा उभारणीसाठी संभाव्य वैयक्तिक/संस्थात्मक गुंतवणूकदार परताव्याच्या रूपात उत्पन्नाचा एक छोटासा भाग मिळवण्यासाठी लहान रकमेचीही गुंतवणूक करू शकतात.
विविध क्षेत्रातील 10 पब्लिक इन्फ्रा इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvITs) विविध श्रेणीतील रस्ते प्रकल्पांसाठी जारी केले जातील. पहिला प्रोजेक्ट येत्या एक महिन्यात सुरू होऊ शकतो. या माध्यमातून भारताच्या महामार्ग विकास कार्यक्रमासाठी सामान्यांकडून पैसा उभा केला जाईल, असे गडकरी म्हणाले.
सुरुवातीला पूर्ण झालेल्या रस्ते प्रकल्पांमध्ये पैसे गुंतविण्याची संधी दिली जाईल. त्यात किमान 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 8 टक्के निश्चित परतावा मिळेल.. शिवाय, नागरिकांच्या पैशांची हमी सरकार घेणार असल्याने, हा पैसा सुरक्षित असेल.. शिवाय, कमावलेल्या नफ्यावर अल्पकालीन भांडवली नफा करातूनही सूट देण्याचा विचार सुरु असल्याचे ते म्हणाले..