सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. भारतात सध्या वेगवेगळ्या ठिकाणानुसार, सोन्याच्या दरात बदल पाहायला मिळतात. सोन्याची आयात होऊन बंदरावर उतरवले जाते.. तेथून ते देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवले जाते.. त्यामुळे वाहतूक खर्च जोडल्यानंतर प्रत्येक राज्यातील सोन्याचा भाव वेगळा होतो.
आता असं होणार नाही.. सोन्याच्या दरातील हा फरक लवकरच दूर होणार आहे. गुजरामधील गांधीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी ‘बुलियन एक्स्चेंज’ (Bullion Exchange) सुरु झालं. त्यामुळे लवकरच ‘वन नेशन, वन गोल्ड रेट’ योजना (One Nation-One Gold Rate Scheme) लागू होईल. या योजनेनुसार, देशात कुठेही सोने घेतले, तरी त्याचा दर एकसारखाच असणार आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतंच गुजरातमध्ये पहिल्या भारतीय बुलियन एक्सचेंजचे उद्घाटन झालं.. त्यामुळे आता भारतात आयात होणाऱ्या सोन्याची खरेदी-विक्री प्रक्रिया सोपी होईल. त्यामुळे जागतिक बाजारातही सोन्या-चांदीत गुंतवणूक करणं शक्य होणार आहे. भारतीय बुलियन एक्सचेंजवर (IIBX) आतापर्यंत 64 सराफ व्यापारी जोडले गेले आहेत.
बुलियन एक्सचेंजबाबत…
आतापर्यंत काही बँका किंवा केंद्रीय बँकांकडून मंजुरी मिळालेल्या संस्थांनाच देशात सोने- चांदीची आयात करता येत होती. मात्र, आता आंतरराष्ट्रीय बुलियन एक्स्चेंजच्या मदतीने केवळ पात्र ज्वेलर्सच सोने-चांदी आयात करू शकतील. पात्र ज्वेलर्स बनण्यासाठी ‘आयएफएससी’ (IFSC)मध्ये नोंदणी करावी लागेल..
सोन्याची आयात करण्यासाठी सराफाकडे किमान 25 कोटींची निव्वळ संपत्ती असणं आवश्यक आहे. शिवाय, मागील 3 वर्षांच्या उलाढालीपैकी 90 टक्के भाग हा सराफा व्यवसायाचा असावा लागेल. ‘बुलियन एक्सचेंज’च्या माध्यमातून सोन्याची देवाण-घेवाण करता येईल. त्याची आयात करता येईल. त्यासाठी 125 टन सोने, तर 1000 टन चांदीची मर्यादा असेल.
ग्राहकांचा काय फायदा..?
‘बुलियन एक्सचेंज’मुळे देशात सोन्या-चांदीचा एकच दर लागू होईल.. हे एक प्रकारे शेअर बाजाराप्रमाणेच असेल.. सुरुवातीला सकाळी 9 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत येथे व्यापाराला परवानगी दिली आहे. लवकरच 22 तासांपर्यंतही ट्रेडिंग करता येईल.. पात्र ज्वेलर्सना 11 दिवसांची आगाऊ पेमेंट सुविधा मिळेल. सर्व करार ‘डॉलर्स’ व ‘सेटलमेंट डॉलर’मध्ये सूचीबद्ध होतील.
‘बुलियन एक्सचेंज’मुळे जागतिक सराफा बाजाराशी भारत जोडला जाईल. सोन्याचा भावही भारत ठरवेल. सोन्याची आयात स्वस्त होईल.. त्याचा फायदा ग्राहकांना होईल.. शिवाय, गुणवत्तेसह किंमत व पारदर्शकतेची हमी मिळेल. आंतरराष्ट्रीय कंपन्या एका प्लॅटफॉर्मवर येतील. त्याचा लाभ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांना होईल, असं सांगितलं जातं..