देशातील 73 लाखांहून अधिक पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. जीवन प्रमाणपत्र.. अर्थात ‘डिजिटल लाईफ सर्टिफिकेट’ सादर करताना, पेन्शनधारकांची होणारी ससेहोलपट लक्षात घेऊन ‘ईपीएफओ’ने (EPFO) नुकताच मोठा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे..
2015-16 पासून ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट्स’ (Digital life certificates) सुरु करण्यात आले. त्याद्वारे पेन्शनधारकांना आधार क्रमांक वापरून बायोमेट्रिक पडताळणीनंतर प्रमाणपत्र मिळते. पेन्शन चालू ठेवण्यासाठी पेन्शनधारकांना दरवर्षी ‘जीवन प्रमाणपत्र’ सादर करावे लागते.. ‘जीवन प्रमाणपत्र’ सादर न केल्यास, ‘पेन्शन’ (Pension) थांबवली जाते.
‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट्स’ सादर करताना पेन्शनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषत: म्हातारपणामुळे अनेकांना ‘बायोमेट्रिक्स’ची (फिंगर प्रिंट, डोळ्यांची ओळख) समस्या येत होती..
ही बाब समोर आल्यानंतर ‘ईपीएफओ’कडून ‘फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी’.. अर्थात ‘चेहरा ओळख प्रमाणीकरण’ पद्धती आणली आहे.. त्याचा वापर करून पेन्शनधारकांना ‘डिजिटल लाइफ सर्टिफिकेट’ सादर करता येणार आहे.. विशेष म्हणजे, आता हे प्रमाणपत्र ‘ईपीएफओ’च्या पोर्टलवर अगदी घरबसल्याही सादर करता येणार असल्याचे सांगण्यात आले…
डिजिटल कॅल्क्युलेटरलाही मंजुरी
केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी नुकतीच पेन्शनधारकांसाठी ही सुविधा सुरू केली. ‘ईपीएफओ’ची सर्वोच्च संस्था असणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (सीबीटी) नुकतीच बैठक झाली. त्यात पेन्शनच्या केंद्रीकृत वितरण प्रस्तावाला तत्वतः मान्यता देण्यात आली.
बैठकीत ‘पेन्शन व कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना कॅल्क्युलेटर’लाही मान्यता देण्यात आली.. पेन्शनधारक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पेन्शन व मृत्यूनंतर विमा लाभांच्या विविध लाभांसाठी ही ऑनलाइन सुविधा फायद्याची ठरणार आहे.. त्यासाठी दरवर्षी 14 हजार कर्मचाऱ्यांना 8 दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले..