सतत वाढत्या महागाईने त्रासलेल्या नागरिकांसाठी आज (ता. 1) सकाळीच दिलासादायक बातमी आली.. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आर्थिक क्षेत्राशी निगडीत बाबी बदलत असतात.. त्यात सगळ्यांचे लक्ष लागलेले असते, ते गॅस सिलिंडरच्या दराकडे..!! ‘एलपीजी’ सिलिंडरचे नवे दर आज जाहीर झाले.
‘एलपीजी’ सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात करण्यात आली आहे. अर्थात, ही दर कपात व्यावसायिक गॅस (Commercial Lpg Cylinder) सिलिंडरच्या किंमतीत करण्यात आली आहे.. आजपासून दिल्लीत 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर 2012.50 रुपयांऐवजी 1976.50 रुपयांना मिळेल, तर मुंबईत त्यासाठी 1936.50 रुपये मोजावे लागतील. व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी झाल्याने हाॅटेलिंग स्वस्त होण्याची आशा आहे..
घरगुती सिलिंडरचे दर कायम
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबईमध्ये घरगुती सिलिंडरसाठी 1052 रुपये, तर दिल्लीत त्यासाठी 1053 रुपये मोजावे लागत आहेत. 21 मेपासून भारतातील इंधनाचे दर स्थिर आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही.. त्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत जुलैमध्ये 8.50 रुपयांची कपात केली होती. त्यामुळे दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2012.50 रुपये, मुंबईत 1,972.50 रुपये, कोलकात्यात 2,132 रुपये, तर चेन्नईत 2,177.50 रुपये झाली होती.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 6 जुलै रोजी 50 रुपयांनी वाढ केली होती. तसेच 7 मे रोजी सिलिंडरमागे 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. शिवाय, 22 मार्चलाही गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती.
गेल्या 8 वर्षांत ‘एलपीजी’ सिलिंडरच्या किमतीत सुमारे अडीच पटीने वाढ झालीय. ‘आयओसीएल’च्या आकडेवारीनुसार मार्च-2014 मध्ये अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 410 रुपये होती. मार्च-2015 पासून मोदी सरकारने घरगुती स्वयंपाकाच्या गॅसवर दिली जाणारी सबसिडी थेट बँक खात्यावर पाठवण्यास सुरुवात केली..
ग्राहकांना दरवर्षी 12 सिलिंडरवर ही सबसिडी मिळायची. मात्र, नंतर कोरोनामुळे हे अनुदान कमी करण्यात आले.. सरकारने लोकांकडून स्वेच्छेने अनुदान सोडण्याचे आवाहन केले.. कोरोना महामारीच्या काळात तर सर्वांचेच अनुदान बंद करण्यात आले.. त्यानंतर आता पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन घेणाऱ्यांनाच ही सबसिडी दिली जाते.