आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ‘कॅप्टन कुल’ एम. एस. धोनी हा सध्या ‘बिझनेस’ व ‘गुंतवणूक’ क्षेत्रातही जोरदार बॅटिंग करतोय.. आपल्या नव्या इनिंगमध्ये तो चांगलाच स्थिरावल्याचे दिसत आहे.. वेगवेगळ्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये त्याने गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे..
भारतातील विविध कंपन्यांचा तो ‘ब्रॅंड ॲंम्बॅसेडर’देखील आहे.. अशाच एका प्रकरणात तो अडचणीत सापडलाय.. एका कंपनीसोबत झालेल्या आर्थिक व्यवहारावरुन सुप्रिम कोर्टानं धोनीला (MS Dhoni) नोटीस बजावलीय.. नेमकं हे काय प्रकरण आहे, हे सविस्तर जाणून घेऊ या..
नेमकं प्रकरण काय..?
काही दिवसांपूर्वी धोनी हा ‘आम्रपाली ग्रुप’चा ‘ब्रॅंड ॲंम्बेसडर’ होता. मात्र, 2016 साली तो ‘आम्रपाली ग्रुप’पासून वेगळा झाला. मात्र, त्याला या ग्रुपकडून 150 कोटी रुपयांची फी येणे आहे.. मात्र, ‘आम्रपाली ग्रुप’कडून पैसे मिळत नसल्याने धोनीने दिल्ली हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणात मध्यस्थी करण्याची मागणी त्याने हायकोर्टाकडे केली..
धोनीच्या अर्जाविरोधात ‘आम्रपाली’ ग्रुप सर्वोच्च न्यायालयात गेला. दुसरीकडे या ग्रुपच्या ग्राहकांना त्यांचे फ्लॅट मिळालेले नाहीत.. त्यामुळे त्यांनीही सुप्रिम कोर्टात धाव घेतलीय.. ‘आम्रपाली’ ग्रुपकडे निधीची कमतरता आहे.. त्यात त्यांनी धोनीची थकबाकी दिल्यास बुकिंग केलेले फ्लॅट मिळणं अवघड होईल, असा युक्तिवाद पीडित ग्राहकांतर्फे करण्यात आला.
‘आम्रपाली ग्रुप’ व धोनीची ही केस पहिल्यांदा दिल्ली हायकोर्टात सुरु होती. या प्रकरणी हायकोर्टाने निवृत्त जस्टिस वीणा बीरबल यांच्या नेतृत्वाखाली समितीही नेमली.. त्यानंतर पीडित ग्राहकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. आता यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने धोनी व ‘आम्रपाली ग्रुप’लाही नोटीसा बजावल्या असून, दोघांनाही आपआपल्या बाजू मांडण्यास सांगितले आहे.