भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल, अशी बातमी आहे. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची (Silver) कमाई केली. नीरजने 88.13 मीटर भालाफेक करताना रौप्य पदक आपल्या नावावर केलं. ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने 90.54 मीटर अंतरावर भालाफेक करताना ‘गोल्ड मेडल’ जिंकलं.
2003 मध्ये लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत (world athletics champioships) कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर तब्बल 19 वर्षांनंतर नीरजने या स्पर्धेत पदक जिंकले आहे.. अशी कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय व पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.
युजीनमध्ये सुरु असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 24 वर्षीय नीरजने (Niraj chopra) पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भालाफेक करताना अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आज (रविवारी) अंतिम फेरी पार पडली. त्यात चौथ्या प्रयत्नात नीरजने 88.13 मीटर अंतरावर भाला फेकला नि रौप्य पदक जिंकलं..
चौथ्या प्रयत्नात यशस्वी…
ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर, नंतर 90.46 मीटर अंतरावर भाला फेकला होता. सहाव्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी करताना 90.54 मीटर भालाफेक केली नि सुवर्णपदकावर नाव कोरले.. पहिल्या तीन फेऱ्यांमधील कामगिरीनंतर नीरज चौथ्या क्रमांकावर होता, परंतु चौथ्या प्रयत्नात नीरज थेट रौप्य पदकाच्या शर्यतीत आला.
नीरजने ‘फाऊल थ्रो’ने सुरुवात केली.. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 82.39 मीटर, तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर, तर चौथ्या प्रयत्नात त्याने 88.13 मीटर भाला फेकत दुसऱ्या क्रमांकांवर झेप घेतली. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला व शेवटच्या प्रयत्नात त्याला 90 मीटर भाला फेकता आला नाही.. त्याचा हा प्रयत्नही फाऊल ठरला.
1983 पासून जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा भरवली जाते. मात्र, आतापर्यंत या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकाला गवसणी घालता आलेली नाही.. 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीत भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते. त्यानंतर नीरजने एक पाऊल पुढे जाताना भारताला ‘सिल्वर’ मेडल मिळवून दिलं..