भारताला आज नव्या राष्ट्रपती मिळाल्या.. राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांनी एकतर्फी विजय मिळवला.. ‘यूपीए’चे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा या निवडणुकीत पराभव झाला..
द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिल्या आदिवासी समाजाच्या महिला राष्ट्रपती मिळाल्या.. शिवाय, त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. याआधी प्रतीभाताई पाटील यांनी राष्ट्रपतीपद भूषवले आहे.. राष्ट्रपती पदासाठी (President of India) 18 जुलैला मतदान झालं होतं. त्याची मतमोजणी आज होऊन निकाल जाहीर करण्यात आला..
निवडणुकीत ‘क्राॅस वोटिंग’..
खरं तर मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. या निवडणुकीतही 17 खासदार व 100 पेक्षा जास्त आमदारांनी ‘क्रॉस वोटिंग’ केल्याचं दिसून आलंय.
महाराष्ट्रातील 16 आमदारांची मतं फुटल्याचं दिसतं. या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तब्बल 16 आमदारांनीही ‘क्राॅस वोटिंग’ केल्याचं समोर आलंय..
द्रोपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 खासदारांची, तर यशवंत सिन्हा यांना 208 खासदारांची मते मिळाली. द्रोपदी यांना पहिल्या फेरीत मिळालेल्या मतांचं मूल्य 3 लाख 78 हजार इतके होते, तर यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचं मूल्य 1 लाख 45 हजार इतकं होतं. पहिल्या फेरीत 15 मते रद्द झाली.
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही द्रौपदी मुर्मू यांना चांगली मते मिळाली. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश व झारखंड या 10 राज्यांची मतमोजणी दुसऱ्या फेरीत झाली. त्यात तब्बल 1886 मते वैध ठरली. पैकी द्रोपदी मुर्मू यांना 1349 मते मिळाली.. त्याचं मूल्य 4,83,299 इतकं आहे. यशवंत सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मूल्य हे 1,79,876 इतकं ठरलं. अखेर द्रोपदी मुर्मू यांना विजयी घोषीत करण्यात आलं..
सोमवारी घेणार शपथ
दरम्यान, येत्या 24 जुलैला विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे.. त्यानंतर 25 जुलैला द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. द्रोपदी मुर्मू यांचा विजय निश्चित होताच, देशभरातील आदिवासी बांधवांनी जल्लोष करायला सुरुवात केली.. ठिकठिकाणी आदिवासी नृत्य सादर करुन द्रोपदी मुर्मू यांच्या विजयाचा आनंदा साजरा केला..