मुंबई : मागील काही वर्षापासून क्रिकेटविश्वात टी20 लीगचे फॅड सुरू झाले आहेत. अनेक देशांनी त्यांच्या देशांत आता टी20 लीग देखील सुरू केल्या आहेत. अशातच आता दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील आणखी एक टी20 लीग सुरू होणार आहे. याला आपण मिनी आयपीएल किंवा छोटी इंडियन प्रीमियर लीग असे देखील म्हणू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेत आता लवकरच मिनी आयपीएल स्पर्धा होण्याची खात्री आहे. 13 जुलै रोजी झालेल्या लिलावात 29 गुंतवणूकदारांनी बोली लावली असून यामध्ये आयपीएल संघमालकांनी सहभाग नोंदविला आहे. या लिलावामध्ये त्यांचेच वर्चस्व असल्याचे दिसून आले.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या या टी20 लीग स्पर्धेसाठी सहा आयपीएल फ्रॅंचायजींनी संघ विकत घेतले असण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियंसचे मुकेश अंबानी, चेन्नई सुपर किंग्सचे एन श्रीनिवासन, दिल्ली कैपिटलचे पार्थ जिंदल, सनराइजर्स हैदराबादचे मारन, लखनऊ सुपर जाएंट्सचे संजीव गोयनका आणि राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले यांनी या लिलावामध्ये बोली लावली आहे. ही लीग पुढच्या वर्षी (2023) खेळली जाणार आहे.
या लीगच्या सीएसएने म्हटल्यानुसार, या महिन्याच्या शेवटी संघांची नावे जाहीर केली जाणार आहे. मात्र क्रिकबजने स्पष्ट केले की, काही संघांसाठी नावे तयार असून यामध्ये मुंबई इंडियन्ससाठी केपटाउन, चेन्नई सुपर किंग्जसाठी जोहान्सबर्ग आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सहमालकाचा संघ सेंच्युरियन असणार आहे.
या दोन भारतीय संघावर सर्वाधिक बोली :-
मुंबई आणि चेन्नईने या लिलावामध्ये लावलेली बोली अधिक मोठी ठरली आहे. त्यांनी 250 कोटी रुपयांच्या आसपास बोली लावल्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, या लीगमध्ये भारतीय गुंतवणूकदारांबरोबरच बाकी देशांतील गुंतवणूकदारांनीही भाग घेतला होता. त्यामध्ये केविन पीटरसनच्या संस्थेचा समावेश होता. मात्र आयपीएलच्या संघमालकांसमोर सर्व फिके पडल्याचे सांगण्यात येते.
Advertisement