प्रत्येकाला आपलं, आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित असावं, असं वाटतं.. त्यासाठी महत्वाचा असतो, विमा.. फक्त अपघात झाल्यावरच नाही, तर तुम्ही अचानक आजारी पडले, तरी विम्यामुळे (Insurance) संरक्षण मिळते.. आयुर्विमा, मुदत विमा, आरोग्य विमा आदींमुळे भविष्य सुरक्षित होऊ शकतं.
विम्याचे इतके फायदे असतानाही, अनेक जण विमा काढण्याकडे दुर्लक्ष करतात.. विशेषत: समाजातील निम्न उत्पन्न गटातील किंवा गरीब गटातील लोकांत विमा घेण्याबाबत उदासीनता दिसते. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे, पैसा.. अनेकांकडे विम्याचा हप्ता भरण्याचेही पैसे नसतात. ही बाब लक्षात घेऊन विमा नियामक ‘आयआरडीए’कडून मोठा निर्णय घेतला आहे..
विम्यासाठी मिळणार कर्ज..
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण.. अर्थात ‘आयआरडीए’ने विमा हप्त्याचे पैसे भरण्यासाठी एक योजना आणली आहे.. त्यामुळे लोकांना एकाच वेळी विम्याचा हप्ता भरण्यासाठी कर्ज (loan) मिळेल. हे कर्ज नंतर हप्त्यांमध्ये फेडू शकतील. त्यामुळे भारतात मोठ्या संख्येने लोक विमा काढतील, असा दावा केला जात आहे.
तसेच, किरकोळ व कॉर्पोरेट ग्राहकांनाही विमा खरेदीसाठी कर्ज देण्याची तयारी ‘आयआरडीए’ने केली आहे. दोन्ही प्रकारचे ग्राहक विम्याचा प्रीमियम भरण्यासाठी कर्ज घेऊ शकतात व नंतर त्याचे हप्ते भरू शकतात. त्यामुळे नागरिकांवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात प्रीमियमचा भार पडणार नाही..
कसं मिळेल कर्ज..?
- ‘आयआरडीए’कडून ही व्यवस्था अंमलात आल्यास वित्त पुरवठादार नागरिकांचे विमा कंपनीचे प्रीमियम भरेल.
- किरकोळ व कॉर्पोरेट ग्राहकांकडून मासिक हप्त्यांमधून त्या कर्जाची वसुली केली जाईल…
- समजा, ग्राहक कर्जाचे हप्ते फेडू शकला नाही, तर विमा कंपनीकडून ‘प्रो-रेटा’ आधारावर वित्त प्रदात्याला कर्जाची रक्कम परत केली जाईल..
सध्या तरी भारतात विमा काढण्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध नाही. ही प्रणाली लागू झाल्यानंतर विम्याचे नूतनीकरण करण्याचे प्रमाण वाढेल. पैशांअभावी विमा न काढणारे लोकही विमा खरेदी करु शकतील. कारण, त्यांना वर्षाचा प्रीमियम एकाच वेळी भरावा लागणार नाही, असे सांगण्यात आले..