गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली.. मुसळधार पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.. अनेक घरांची पडझड झाली.. नदी-नाल्यांना पूर आला.. मात्र, आता राज्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला आहे.
मुसळधार पावसाने विश्रांती घेतल्याचे दिसत असले, तरी हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे.. कारण, पुढील तीन दिवसांनी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Maharashtra Rain Update) वर्तवला आहे..
अरबी समुद्रातील उत्तर पूर्व भागापासून ते सौराष्ट्र, कच्छच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 21 जुलैनंतर राज्यात विशेषत: कोकणात पुन्हा जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे..
राज्यात गेल्या 10 दिवसांपासून सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला.. त्यामुळे राज्याची जुलै महिन्याची पावसाची सरासरी ओलांडली. सध्या पावसाचा जोर ओसरला असला, तरी 19 जुलैपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
अरबी समुद्रात जोरदार वारे
दरम्यान, गुजरातची किनारपट्टी ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. अरबी समुद्रात प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत. त्यांचा वेग तब्बल ताशी 45 ते 55 किमी असू शकतो. त्यामुळे मासेमारीसाठी मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
जूनमध्ये बराच काळ पावसाने ओढ दिल्याने राज्यात अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. आता पेरण्यांना उशीर झाला असला, तरी चांगला पाऊस झाल्याने बळीराजा कामाला लागला आहे.. खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे.. वाफसा झालेल्या ठिकाणी पेरण्या सुरु झाल्या आहेत..
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 3 दिवसांत पुन्हा पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठा घाई करावी लागणार आहे. पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यास शेतीची कामे तशीच राहण्याची शक्यता आहे..