‘या’ दिग्गज टेक कंपन्यांकडून भारतातील वृत्तपत्रे आणि डिजिटल मीडियाला मिळणार उत्पन्न; केंद्र सरकार करणार ‘असं’ काही
मुंबई : भारतात सध्या केंद्र सरकारकडून सातत्याने विविध निर्णय देशवासियांसाठी घेतले जात आहेत. आता केंद्र सरकार भारतीय वृत्तपत्रे (Newspaper) आणि डिजिटल मीडियासाठी लवकरच मोठा निर्णय घेणार आहे. गुगल, मेटा म्हणजेच फेसबुक यांसारख्या कंपन्यांकडून भारतीय वृत्तपत्रे आणि डिजिटल वृत्त प्रकाशकांना महसूल मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गुगलसारख्या कंपनीकडे युट्युब सारख्या कंपनीची मालकी आहे तर मेटाकडे फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्राम सारख्या कंपन्यांची मालकी आहे.
अशा कंपन्यांकडून भारतीय वृत्तपत्रे, डिजिटल मीडियाची माहिती अर्थात कंटेंटसाठी महसूल मिळण्यासाठी केंद्र सरकारनं पाऊलं उचलल्याचं बोललं जात आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा, ट्विटर, अमेझॉन या कंपन्या भारतीय वृत्तपत्र आणि प्रकाशकांची मूळ माहिती सातत्याने वापरत आहेत. यासाठी टेक कंपन्यांकडून प्रकाशकांना त्यांचा वाटा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून केंद्र सरकार यासाठी पाऊले पुढे टाकत आहे. युरोपीय संघ आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशा टेक कंपन्यांकडून एक निश्चित प्रकारचं उत्पन्न घेतलं जातं.
या कंपन्यांकडून उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक पाऊल नियामक मंडळाद्वारे उचलली जात आहेत. या संदर्भातील निर्णयांमुळे आगामी काळात आयटी क्षेत्रात अधिक सुधारणा होण्यास मदत होईल. सध्या मोठ्या टेक कंपन्यांकडून डिजिटल बाजारपेठेवर भर दिला जात असून भारतीय मीडिया कंपन्यासाठी एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध करून त्यातून उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रत्नशील आहे. स्वतंत्र बातम्या आणि प्रकाशकांद्वारे तयार केलेल्या बातम्या/माहिती वापरण्यासाठी मोठ्या टेक कंपन्यांना पैसे आकारण्यावर केंद्र सरकारचं लक्ष आहे.