अनेक विद्यार्थ्यांचे डाॅक्टर होण्याचं स्वप्न असतं.. त्यासाठी दरवर्षी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी'(NTA)द्वारे बारावीनंतर ‘नीट’ (NEET) ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. येत्या 17 जुलैला दुपारी 2 ते 5:20 या वेळेत ही परीक्षा होणार आहे. देशातील 546 शहरे, तसेच देशाबाहेरील 14 शहरांमधील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल..
‘नीट’ परीक्षेसाठी सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेतील काॅपीचे प्रकार टाळण्यासाठी नुकतीच नियमावली जाहीर करण्यात आली आहे.. ती पुढीलप्रमाणे :
विद्यार्थ्यांसाठी नियमावली
- परीक्षार्थींना कमी उंचीच्या टाचांसह चप्पल व सँडलला परवानगी आहे, मात्र परीक्षा हॉलमध्ये शूज घालून येता येणार नाही..
- परीक्षा केंद्रात कोणतेही दागिने वा धातूचे सामान नेण्यास परवानगी नाही.
- हातात कोणतेही घड्याळ किंवा स्मार्टवाॅच, ब्रेसलेट, कॅमेरा आदींना परवानगी नाही.
- विद्यार्थ्यांना पाकीट, गॉगल, हँडबॅग, बेल्ट, टोपी आदी वस्तू घालता येणार नाहीत. तसं कोणी आढळल्यास नियमानुसार ते बाहेरच काढून टाकण्यास सांगितले जाणार आहे..
- महिला उमेदवारांची तपासणी केवळ महिला कर्मचाऱ्यांद्वारेच बंद खोलीत केली जाईल.
- परीक्षा केंद्रात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कॅल्क्युलेटर, मोबाईल नेता येणार नाही.
- विद्यार्थ्यांना कोविड-19 संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक असेल.
- विद्यार्थ्यांनी सोबत फोटो ओळखपत्र, पासपोर्ट व पोस्टकार्ड आकाराचे छायाचित्र आणावे लागेल. अर्ज भरताना वापरलेला फोटो सारखाच असावा.
उद्या मिळणार प्रवेशपत्र..
‘नीट’ परीक्षेचे प्रवेशपत्र उद्या (12 जुलै) सकाळी 11:30 वाजेपासून जारी केलं जाणार आहे. त्यासाठी ‘एनटीए’द्वारे जारी केल्या जाणाऱ्या वेबसाईटवरुन हे प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि सुरक्षा पिन वापरावा लागेल. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.
प्रवेशपत्र असं करा डाऊनलोड
- ‘नीट’ परीक्षेसाठी प्रवेशपक्ष डाऊनलोड करण्यासाठी पुढील वेबसाइटवर क्लिक करा – neet.nta.nic.in.
- नंतर ‘NEET-UG 2022 अॅडमिट कार्ड’ लिंकवर क्लिक करा.
- तुमचा अर्ज क्रमांक किंवा इतर आवश्यक तपशीलांसह ‘लॉग इन’ करा.
- अॅडमिट कार्ड डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढा.
यंदाची ‘नीट’ परीक्षा 91,415 मेडिकल, 26,949 डेंटल, 52,720 आयुष व 603 पशुवैद्यकीय जागांसाठी घेतली जाणार आहे. ही परीक्षा 13 भाषांमध्ये होणार आहे. ‘बीएससी नर्सिंग’ व ‘लाइफ सायन्स’ अभ्यासक्रमांसाठीही या परीक्षेतील स्कोअरचा उपयोग होणार आहे…