SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ठाण्यातील 67 पैकी 66 नगरसेवक शिंदे गटात; मात्र अजूनही शिवसेनेतच असणारी ‘ती’ नगरसेविका कोण?

महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारुन भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी आपला राजकीय प्रभाव असणाऱ्या ठाण्यामध्ये अजून एक झटका शिवसेनेला दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील 67 पैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला असून काल या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. शिवसेनेसाठी आमदारांच्या बंडानंतर हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांची ठाणे जिल्ह्यावर मजबूत पकड आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची सूत्रे आली होती. ठाणे महापालिकेत मागील काही दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील 67 पैकी 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने ठाकरे गटापुढील अडचणी आता वाढल्या आहेत. मात्र, महत्वाची बाब म्हणजे 67 पैकी 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असले तरी एक नगरसेवक मात्र अद्यापही ठाकरे गटामध्येच असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

या नगरसेविका चरई प्रभागाच्या असून त्याचे नाव नंदिनी विचारे असे आहे. त्या शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आहेत. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच खासदार भावना गवळी यांना मुख्य प्रतोद पदावरून हटवलं आणि त्या जागेवर राजन विचारे यांची नियुक्ती केली. 2017 मध्ये नंदिनी विचारे यांचं नाव महापौरपदाच्या शर्यतीतही आघाडीवर होतं. आणि विचारे हे कायमस्वरूपी उद्धव ठाकरे यांच्या गटातच राहणार आहेत.

दरम्यान, ठाणे महापालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडे 34, भाजपकडे 23, काँग्रेसकडे 3 आणि एमआयएमकडे 2 नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Advertisement