गेल्या काही दिवसांत देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण जाेरात सुरु असल्याचेही दिसते.. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे..
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन केले होते. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर 9 महिन्यांनंतर ‘बुस्टर डोस’ दिला जात होता. मात्र, आता हा कालावधी कमी केला असून, आता 6 महिन्यांनीच ‘बुस्टर डोस’ घेता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली..
‘या’ लोकांना मोफत मिळणार
भारतात आतापर्यंत दुसऱ्या डोसनंतर 9 महिन्यांनी, अर्थात 39 आठवड्यांनंतर ‘बूस्टर डोस’ दिला जात होता, पण आता ते 6 महिने, अर्थात 26 आठवड्यांवर आणले आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपच्या (NTAGI) स्टँडिंग टेक्निकल सब कमिटीच्या (STSC) निर्देशानुसार हा कालावधी कमी करण्यात आला आहे.
सध्या भारतात 18 ते 59 वयोगटातील लोकांना दुसऱ्या डोसनंतर ‘बुस्टर डोस’ (तिसरा डोस) दिला जात आहे.. आता या ‘बुस्टर डोस’चा कालावधी 6 महिन्यांवर आणला आहे.. खासगी लसीकरण केंद्रांवर हा डोस सशुल्क घेता येणार आहे.
तसेच 60 वर्षांवरील नागरिक, तसेच ‘फ्रन्ट लाईन वर्कर्स’ना सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बुस्टर डोस दिला जाणार असल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे..
सध्या कोरोना संसर्गाचा वेगाने फैलाव होत असताना, ‘बुस्टर डोस’चा कालावधीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले..