राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. शेतकऱ्याच्या जमिनीची सारी कुंडली सात-बारा उताऱ्यावर असते. त्यामुळेच या सात-बारा उताऱ्याला ‘जमिनीची आरसा’ असं म्हटलं जातं.. शेतीबाबतची सारी नोंद या सात-बारा उताऱ्यावरच असते..
राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सात-बारा उतारे, नकाशे, फेरफार आदी दस्ताऐवजांचे संगणकीकरण केले जात आहे. जमिनीची मोजणी अचूक पद्धतीने व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही मोजणी अचूक करतानाच प्रत्येक सर्व्हे नंबरचे को-ऑर्डिनेट निश्चित करण्यात येणार आहे.
राज्यात शेतीच्या सात-बारा उतार्यात एकसमानता आणल्यानंतर भूमिअभिलेख विभागाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.. प्रत्येक सात-बारा उताऱ्यासाठी आता ‘क्यूआर कोड’ दिला जाणार आहे.. गेल्या काही दिवसांत जमीन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सात-बारा उताऱ्यावरील ‘क्यूआर कोड’ मोबाईलद्वारेही स्कॅन करता येईल. हा क्यूआर कोड स्कॅन करताच संबंधित सर्व्हे नंबरचे फेरफार उतारे, जमिनीचा नकाशा, जमिनीचे नेमके स्थान कोठे आहे, याची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर तुमच्या समोर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसणार असल्याचे सांगितले जाते..
सरकारकडे प्रस्ताव
भूमिअभिलेख विभागाने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर सात-बारा उतार्यावर ‘क्यूआर कोड’ दिले जाणार आहेत.. सात-बारा उतार्यावर ‘क्यूआर कोड’ नेमका कोठे द्यायचा, याबाबत ठरलेले नाही.. राज्य शासनाने प्रस्तावास मान्यता दिल्यानंतर त्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले..
शेतीच्या ‘सात-बारा’ उतार्यावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन करताच जमिनीची संपूर्ण माहिती मोबाईलवर उपलब्ध होईल… त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात कोणालाही फसवणूक करता येणार नाही..