मुंबई :
केंद्र सरकारने आता तीनही सेनादलांसाठी एक विशेष भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. ‘अग्निपथ’ असं या योजनेला नाव देण्यात आलं आहे. ‘अग्निपथ’ची घोषणा झाल्यापासून तर आतापर्यंत अग्निपथला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आहे. असं असतानाही आता अग्निपथ योजनेअंतर्गत थेट भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. केंद्र सरकारने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत तरुणींनाही विशेष संधी मिळणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत तरुणींना 20 टक्के जागा राखीव ठेवली जाणार आहे.
2022मध्ये होणाऱ्या पहिल्या बॅचच्या भरतीमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव असेल. भारतीय वायुसेनेसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवारांची 24 जुलै ते 31 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
यानंतर जे उमेदवार या ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होतील अशा उमेदवारांची 21 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दरम्यान शारीरिक चाचणी घेतली जाईल. त्यानंतर 29 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी 1 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.
30 डिसेंबर पासून उमेदवारांच्या प्रक्षिक्षणास सुरुवात होईल. अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणेच भत्ता मिळणार आहे. यासोबतच अग्निविरांना वर्षातून 30 दिवसांची सुट्टी मिळेल. प्रत्येक अग्निवीरला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आणि सेवेदरम्यान वीरगती आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल. अग्निवीरांना कॅन्टीन सुविधा देण्यात येणार आहे. चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना अनेक सरकारी सेवांमध्ये आरक्षण आणि प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही वायू दलाने स्पष्ट केलं आहे.