मोदी सरकारने नोटाबंदी केल्यानंतर भारतीय चलनात नव्या नोटा जारी करण्यात आल्या. आधीच्या नोटांच्या तुलनेत या नव्या नोटांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही नव्या नोटांच्याही बनावट नोटा तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या नोटा (ruppee) खराब होण्याचेही प्रमाणही वाढत आहे.
जुन्या व फाटलेल्या नोटा वापरण्याचा प्रयत्न काही जण करीत असतात. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बॅंकेने अशा नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.. ‘आरबीआय’च्या नव्या निर्णयानुसार, आता नोटांची योग्यता तपासली जाणार आहे. नोटा मोजणाऱ्या मशीनऐवजी नोटांची फिटनेस तपासणाऱ्या मशीन वापरण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांना केल्या आहेत.
‘आरबीआय’च्या (RBI) सूचनेनुसार आता दर तीन महिन्यांनी नोटांचा फिटनेस तपासला जाणार आहे. बँकेतून जाणारी वा येणारी प्रत्येक नोट काळजीपूर्वक पाहिली जाणार आहे. नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही काही बदल करण्यात आले. प्रामुख्याने नोटांची सत्यता पडताळतानाच त्या व्यवहारासाठी योग्य आहेत की नाही, याची चाचपणी या मशीनद्वारे केली जाणार आहे.
तुमच्या खिशात ठेवलेली नोट (currency) योग्य आहे की अयोग्य, हे तपासण्यासाठी ‘आरबीआय’ने 11 मानके निश्चित केली आहेत. ही मानके खालीलप्रमाणे आहेत :
अशा नोटा बाद होणार…
- अतिशय घाणेरड्या अवस्थेतील, ज्या नोटांवर भरपूर धूळ आहेत, त्या अयोग्य समजल्या जातील.
- नोट बराच काळ चलनात राहिल्याने नरम पडते. नरम पडलेल्या नोटा यापुढे अयोग्य समजल्या जातील. कडक नोटांचा समावेश चांगल्या श्रेणीत होईल.
- कोपऱ्यावर किंवा मध्यभागी फाटलेल्या नोटा अयोग्य समजल्या जातील.
- नोट क्षमतेपेक्षा जास्त दुमडलेली असेल, म्हणजेच क्षेत्रफळ 100 चौरस मिलिमीटरपेक्षा जास्त असल्यास ती नोट अयोग्य मानली जाईल.
- 8 चौरस मिलिमीटरपेक्षा मोठे छिद्र असलेली नोट अयोग्य मानली जाईल.
- नोटेतील कोणताही ग्राफिक बदल अयोग्य मानला जाईल.
- नोटेवर खूप डाग, पेनाची शाई असल्यास ती नोट अनफिट असेल.
- नोटांवर काही लिहिले असल्यास, पेंटिंग असल्यास अयोग्य असेल.
- नोटेचा रंग उडाला, तर ती नोट अनफिट मानली जाईल.
- फाटलेल्या नोटेवर कोणत्याही प्रकारचा टेप किंवा गोंद असल्यास त्या नोटा अयोग्य समजल्या जातील.
- नोटांचा रंग गेला असेल किंवा फिकट झाला असेल, तर त्यांचाही समावेश अनफिट असतील.
अनफिट नोट ओळखण्यासाठी ‘आरबीआय’ अद्ययावत मशीन बनवत आहे. हे मशीन अनफिट नोटा ओळखून बाजूला करील. सर्व बँकांना या मशीनचा योग्य वापर करण्याच्या सूचना ‘आरबीआय’ने दिल्या आहेत.