SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ठरतेय भविष्यासाठी फायदेशीर; वाचा, काय आहेत फायदे

केंद्रातील मोदी सरकारने आजवरच्या आपल्या काळात सर्वसामान्य नागरिक, मजूर, गृहीणी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. असंघटित क्षेत्रात कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी मोदी सरकारने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणली आहे. निवृत्तीनंतर पेन्शन देण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने ही योजना कार्यान्वित केली असून ज्याचे मासिक उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळू शकतो.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत मजुरांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना मासिक 3 हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची योजना आहे. या दरम्यान पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, पेन्शनच्या 50 टक्के रक्कम जोडीदाराला दिली जाईल. जाणून घ्या योजने बाबत थोडक्यात…

‘या’ योजनेचा लाभ कसा मिळवावा?
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना नोंदणी करावी लागेल. सरकारी आकडेवारीनुसार देशभरात असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी मजूर काम करतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे आणि 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये गुंतवावे लागतील. कामगाराचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन सुरू होईल.

हे लोक करू शकणार नाहीत अर्ज :
EPFO, NPS आणि ESIC चे सदस्य प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करू शकणार नाहीत. याशिवाय करदात्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत केवळ असंघटित क्षेत्रातील कमी वेतनावर काम करणार्‍या मजुरांनाच लाभ मिळू शकतो.

अर्ज कसा करावा :
▪️ प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी http://www.maandhan.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
▪️ यानंतर सेल्फ एनरोलमेंट वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर Proceed वर क्लिक करा.
▪️ नाव, ई-मेल आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा. OTP सत्यापित करा.
▪️ यानंतर अर्जाचे पान उघडेल. मागितलेली माहिती नोंदवा आणि सबमिट करा.

टीप : वरील योजनेच्या नियमात काही बदल असू शकतो. वाचकांच्या माहितीकरिता ही माहिती देण्यात आली असून या बातमी मध्ये काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी खात्री करून घ्यावी. व त्यानंतरच अर्ज करावा.

Advertisement