नोकरदारांच्या पगारातून दर महिन्याला ‘पीएफ’ स्वरुपात (भविष्य निर्वाह निधी) ठराविक रक्कम कापली जाते.. कर्मचारी भविष्य निधी संघटन (EPFO) या संस्थेत ही रक्कम जमा होत असते. ‘पीएफ’च्या रकमेवर या संस्थेकडून चांगले व्याजही दिले जाते.. या पैशांमुळे कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते…
अनेक जण नोकरीला लागल्यापासून ही रक्कम काढत नाहीत. त्यामुळे ‘पीएफ’ खात्यात मोठी कमाई जमा होत असते. त्यामुळे ‘पीएफ’ खातेदारांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असते. गेल्या काही दिवसांत सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
बॅंकेपेक्षा ‘पीएफ’ खात्यात मोठी रक्कम असल्याचे सायबर चोरांनाही चांगलेच ठाऊक आहे.. त्यामुळे त्यांच्याकडून ‘पीएफ’ खात्यावर ‘फिशिंग अॅटक’ केला जाऊ शकतो.. ‘फिशिंग’ हा ऑनलाइन फसवणुकीचा एक भाग आहे, ज्यात खातेदारांकडून खात्याबाबत माहिती मिळवून नंतर ते खाते रिकामे केले जाते.
‘ईपीएफओ’कडून ‘अलर्ट’
या पार्श्वभूमीवर ‘ईपीएफओ’कडून सर्व खातेदारांना ‘अलर्ट’ जारी करण्यात आलाय.. खातेधारकांनी चुकूनही ‘पीएफ’ खात्याची माहिती ‘सोशल मीडिया’वर शेअर करू नये. ‘ईपीएफ’ खात्याची (EPF Account) माहिती सायबर चोरांच्या हाताला लागल्यास, ते तुमच्या खात्यातून सहज पैसे काढू शकतात. खातेदाराचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते..
‘ईपीएफओ’कडून कधीही खातेदारांकडून आधार (Aadhaar), पॅन, यूएएन, बँक डिलेट्सची माहिती विचारली जात नाही. कोणी फोन किंवा सोशल मीडियावर तशी माहिती मागत असेल, तर काळजी घ्या. अशा फसव्या फोन कॉलला प्रतिसाद देऊ नका, कोणत्याही मेसेजना रिप्लाय करु नका.
पीएफ खातेदारांनी कधीही फोन किंवा सोशल मीडियावर आधार, पॅन, यूएएन, बँक खाते किंवा ‘ओटीपी’ अशी वैयक्तिक माहिती शेअर करु नये.. ‘ईपीएफओ’ कधीही कोणत्याही सेवेसाठी व्हॉट्स अॅप, सोशल मीडियावर कोणतीही रक्कम जमा करण्यास सांगत नसल्याचे ‘ईपीएफओ’कडून सांगण्यात आले आहे..