पुणे : पावसाला सुरुवात होऊन आता एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप राज्यासह देशाच्या काही भागात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. कदाचित जुलैमध्ये तरी पाऊस पडेल पुरेस चांगला पाऊस पडेल, या आशेवर बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. परंतु यंदा जुलै देखील समाधानकारक पाऊस पडणार नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात येते आहे.
असे असले तरी यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये मात्र जोरदार पाऊस बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसाने काही ठिकाणी हजेरी लावली तरी जूनमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्याने, तसेचनकिनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्यामुळे पावसाचा जोर कमी राहणार आहे. जुलैमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतरच्या पुढच्या दोन महिन्यात मात्र मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
एवढेच नव्हे तर कोकण आणि विदर्भातील गडचिरोली मध्ये सरासरी पाऊस पडला. मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अद्याप पावसाची आवश्यकता आहे. राज्यातील तीन ते चार जिल्हे सोडले तर, उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. देशाचा विचार करता केरळ, कर्नाटकात मध्ये पावसाची कामगिरी समाधानकारक नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत कोकणातील काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.