गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यानंतर गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ झाली. नंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ केली होती. त्याची अंमलबजावणी 16 जूनपासून सुरु झालेली आहे..
पेट्रोलियम कंपन्यांनी आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर (LPG gas sylinder) कनेक्शनच्या दरातही तब्बल 1050 रुपयांची वाढ केलीय.. आजपासूनच (ता. 28) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस कनेक्शनसाठी पूर्वी 2,550 द्यावे लागत, मात्र आता त्यासाठी 3,600 रुपये मोजावे लागणार आहेत.
ऑईल कंपन्यांनी 16 जूनपासून घरगुती गॅस कनेक्शनच्या ‘वन टाइम सिक्युरिटी डिपॉझिट’मध्ये 750 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी 2,200 रुपये ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ द्यावं लागते. अर्थात, गॅस कनेक्शन परत केल्यानंतर ग्राहकांना हे पैसे परत मिळतात.. मात्र, त्यात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांचा खिसा खाली होत आहे..
ऑईल कंपन्यांनी 47.5 किलोच्या गॅस सिलेंडर कनेक्शनच्या ‘सिक्युरिटी डिपॉझिट’मध्येही 900 रुपयांची वाढ केलीय. त्यामुळे पूर्वी या वजनाच्या सिलेंडरच्या कनेक्शनसाठी 6,450 रुपये लागत होते. आता 7,350 रुपये मोजावे लागतील..
हाॅटेलिंग महागणार..
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या ‘सिक्युरिटी डिपॉझिट’मध्ये वाढ झाल्याने हॉटेलिंग महागण्याची चिन्हे आहेत. गॅस कनेक्शनसाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांना हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जादा पैसे मोजावे लागू शकतात. कोरोनामुळे आधीच अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यात इंधन व सिलेंडरच्या दरात वाढ होत असल्याने व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत..