मुंबई :
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारत-एनसीएपी (Bharat-NCAP) किंवा इंडियाज न्यू कार असेसमेंट प्रोग्राम लॉन्च करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत-एनसीएपी (Bharat-NCAP) किंवा इंडियाज न्यू कार असेसमेंट प्रोग्राम लॉन्च करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. आगामी काळात कारला त्यांच्या क्रॅश टेस्टच्या कामगिरीच्या आधारे स्टार रेटिंग दिले जाईल असं या निर्णयामुळे अधोरेखित झालं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. Bharat-NCAP हे ग्राहक केंद्रित व्यासपीठ असेल ज्यामध्ये ग्राहकांना स्टार रेटिंगवर आधारित सुरक्षित कार निवडण्यास सक्षम करेल. यासोबतच Bharat-NCAP सुरक्षित वाहने तयार करण्यासाठी भारतातील ऑटोमेकर्समध्ये स्पर्धेला प्रोत्साहन देईल.
विविध पॅरामीटर्सवर आधारित नवीन कार मॉडेल्समध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय देखील या मार्फत खुला केला जाईल. नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की Bharat-NCAP कार्यक्रमाचे टेस्ट प्रोटोकॉल जागतिक क्रॅश टेस्ट प्रोटोकॉलशी जोडला जाईल. यासहित आगामी काळामध्ये वाहन निर्मात्यांना भारतातील त्यांच्या इन-हाऊस सुविधांवर वाहनांची टेस्ट करण्याची परवानगी देखील देण्यात येईल.
भारतीय वाहन उद्योग क्षेत्राला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे असं देखील गडकरींनी म्हटलं आहे. ऑटोमोबाईल उद्योगाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी Bharat NCAP हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल असं देखील बोललं जात आहे.
या वर्षीच्या मार्च महिन्यात झालेल्या संसदेत भारत-एनसीएपी कार्यक्रमाची माहिती नितीन गडकरी यांनी दिली होती. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत कारची स्टार रेटिंग टेस्ट आणि मूल्यांकन करण्यासाठी एक योजना तयार करत असं देखील त्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे. यासाठी केंद्र सरकार प्रस्तावावर काम करत आहे अशीही माहिती समोर आली आहे.