पावसाळा ऋतू हा सर्वांना आवडतो. पावसाळ्यातील मातीचा सुगंध आणि वातावरणातील थंडावा सर्वांना हवाहवासा वाटतो. मात्र, पावसाळा जितका आनंददायी असतो तितकाच तो आरोग्य आणि सौंदर्याच्या समस्याही घेऊन येतो. पावसाळ्यात अनेक संसर्ग पसरतात अनेक समस्या उद्भवतात. यावेळी स्वतःची विशेष काळजी घेणं आवश्यक असते.
एवढेच नाही तर अनेक वेळा हवामान बदलामुळेही काहींना आजारांना सामोरं जावं लागतं. तर पावसाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने बरेच दिवस कपडे सुकत नाहीत. बुरशीची समस्या उद्भवते. यामुळे सर्दी आणि संसर्ग होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत आम्ही काही टिप्स सांगणार आहोत ज्या पावसाळ्यात तुम्हाला उपयोगी पडतील. यामुळे तुमचं दैनंदिन जीवन सोपं होईल.
या टिप्स नक्की लक्षात ठेवा :
1. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन नक्की लावा. पावसाळ्यातही ऊन्हाची किरणे हानिकारक असतात.
2. घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट नेहमी सोबत ठेवा.
3. फोन किंवा लॅपटॉप ओले होण्यापासून वाचवण्यासाठी पॉलिथिन किंवा वॉटरप्रूफ कव्हर सोबत ठेवा.
4. पावसाळ्यात पांढरे आणि हलक्या रंगाचे कपडे घालणं टाळा.
5. पावसात हलक्या कापडाची पातळ चादर आणि टॉवेल वापरा, हे कपडे लवकर सुकतात.
6. पावसात रोज कपडे धुवू नका. ज्या दिवशी ऊन जास्त असेल त्या दिवशी कपडे धुवा. कपडे उन्हात वाळवा.
7. पावसात घराबाहेर पडताना प्लास्टिकच्या चप्पल वापरा.
8. अन्नपदार्थ हवाबंद डब्यात बंद ठेवा. लोणचे आणि मुरंबा यांचा डबा घट्ट बंद करून ठेवा. यांना बुरशी लागण्याची शक्यता असते.
9. पावसात भिजल्यावर लवंग, काळी मिरी, आले आणि तुळस यांचा चहा किंवा काढा प्या.
10. तुमचे अंथरुण आणि पांघरून सूर्यप्रकाशात वाळत घाला. यामुळे कुबट वास येण्याचा आणि बुरशीचा त्रास दूर होईल.
दरम्यान, या टिप्स फॉलो करून तुम्ही स्वतःची वस्तूंची योग्यरित्या सुरक्षा करू शकता.