एसटी प्रवासात सुट्ट्या पैशावरून प्रवासी नि कंडक्टर (वाहक) यांच्यात होणारे वाद काही नवीन नाहीत. त्यातून बऱ्याचदा मोठ्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता असे वाद होणार नाहीत. एसटी महामंडळाने असे प्रकार टाळण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशात एक पैसा नसला, तरी त्यांना एसटी प्रवास करता येणार आहे..
सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटल पेमेंट केलं जातंय. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने सुमारे पाच हजार नव्या स्वाईप मशिन खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना ‘फोन पे’, ‘गुगल-पे’ अशा ‘युपीआय’द्वारे (UPI) पैसे देऊन एसटी (ST) तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे सुट्या पैशांचा प्रश्नच राहणार नसल्याचे दिसते..
एसटी महामंडळाने पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 एसटी विभागांना नवे ‘स्वाईप मशीन’ दिले आहेत. उर्वरित विभागांना जुलैमध्ये हे मशी दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता रोख रक्कमही जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही..
काही महिन्यापूर्वी एसटी प्रशासनाने ‘स्वाईप मशिन’द्वारे (Swipe mashin) तिकीटे देण्याची पद्धत सुरू केली. मात्र, त्यावेळी केवळ डेबिट व क्रेडिट कार्डद्वारेच तिकीटे दिले जात होती. त्यातही अनेकदा अडचण येत. बऱ्याचदा या मशीन बंद पडत असत. ही बाब लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने नव्या प्रणालीत आवश्यक ते बदल केले आहेत.
नव्या मशीनमध्ये ‘युपीआय’ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना स्मार्टफोनमधील विविध पेमेंट ॲपच्या साहाय्याने एसटी तिकीट काढता येणार आहे.. पूर्वीच्या तुलनेने अद्ययावत प्रणाली सुरु केल्याने प्रवाशांची सोय होणार आहे..
एसटीच्या नव्या प्रणालीबाबत…
- एसटी प्रशासनातर्फे पहिल्या टप्प्यात सात विभागांत सेवा दिली जाणार. त्यात लातूर, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, चंद्रपूर व भंडारा विभागांचा समावेश.
- राज्यातील उर्वरित विभागांत जुलैपासून नवे मशीन उपलब्ध होतील.
- वाहकांना ‘युपीआय’बाबत विशेष प्रशिक्षण
- नव्या स्वाईप मशिनमध्ये ‘क्यूआर’ कोडचा समावेश असेल. तो स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना तिकिटाचे पैसे देता येतील.
याबाबत एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) सुहास जाधव म्हणाले, की ‘प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने 5 हजार मशीन खरेदी केले असून, वाहकांना प्रशिक्षण दिले जात आहे. लवकरच प्रवाशांना युपीआय ॲपद्वारे तिकीट मिळण्यास सुरुवात होईल.