कोरोनाच्या महामारीपासून शिक्षणापासून तर ऑफिसच्या कामपर्यंत सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत असताना व्यवहार देखील मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सुरु आहेत. यामध्ये ऑनलाईन फ्रॉडच्या घटनाही कमालीच्या वाढल्या आहेत. ऑनलाईन बँक फ्रॉडपासून वाचण्यासाठी नेटबँकिंगसाठी सार्वजनिक संगणक कधीही वापरू नका. सार्वजनिक ठिकाणच्या संगणकाचा वापर केल्यामुळे बँकिंग तपशील अधिक धोक्यात येऊ शकतात आणि हॅकर सहजपणे तुमची सुरक्षित माहिती चोरू शकतात. आपल्या अकाऊंटचे पासवर्ड हे दर दोन किंवा तीन महिन्याला बदलत राहा.
असं केल्यामुळे संभाव्य हॅकर्सपासून तुमच्या अकाउंटचे संरक्षण होईल. यासोबतच पासवर्ड सेट करत असताना तो मजबूत, किमान आठ वर्ण असतील असा सेट करा. कोणताही आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्यासाठी सुरक्षित आणि वेरिफाईड वेबसाईट्सचा किंवा अँप्सचा उपयोग करा. अनधिकृत वेबसाईट किंवा अँप वापरल्यामुळे ऑनलाइन बँकिंग फसवणूक होऊ शकते. तुमचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवल्यानंतर त्याची तक्रार करा आणि बँकेकडून त्वरित ते कार्ड ब्लॉक करून टाका.
क्रेडिट किंवा डेबिट कार्ड संदर्भात तपशील विचारण्यासाठी अनोळखी फोन किंवा मेसेज आल्यास माहिती शेअर करू नका. केवळ अस्सल POS मशीनद्वारे असले व्यवहार करा. तुमचा जो वैयक्तिक संगणक आहे, त्यावर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर स्थापित करणे आवश्यक आहे. ऑनलाईन फसवणुकीमुळे होणाऱ्या माहिती गमावण्याचा नुकसानापासून किंवा कोणत्याही धमक्या, Malicious Activitiesचा सामना करण्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर मदत करते आणि सुरक्षा देते. वरील सर्व गोष्टींचे पालन केल्यास आपण निश्चितपणे ऑनलाईन फ्रॉडपासून आपले संरक्षण करू शकतो.