सध्या टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर गेलेली आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना स्थगित करण्यात आला होता. हा सामना आता येत्या 1 जुलैपासून ‘एजबस्टन’ येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियातून महत्वपूर्ण घडामोडी समोर येत आहेत.
कसोटी सामन्यासाठी इंग्लंडला रवाना होण्याआधीच रविचंद्रन अश्विनला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर विराट कोहली यालाहा कोरोनाने घेरल्याचे वृत्त समोर आले.. त्यामुळे कसोटी सामन्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ‘बीसीसीआय’चे प्रयत्न सुरु आहेत.
असे असताना, कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याकडून मोठी चूक झाल्याचे समोर आलेय.. इंग्लडमध्ये काही चाहत्यांनी या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंसह काही फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होत आहेत. मात्र, या फोटाेंमध्ये या दोन्ही खेळाडूंनी कोरोनाबाबत कोणतीही काळजी घेतल्याचे दिसत नाही.
रोहित व कोहलीच्या तोंडाला साधे मास्कही नसल्याने, कोविडच्या पार्श्वभूमीवर ‘बीसीसीआय’ने या दोन्ही खेळाडूंबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोन्ही खेळाडूंवर बरीच टीकाही होत आहे.
गेल्या वर्षीही झाली होती चूक..
गेल्या वर्षीही इंग्लंड दौऱ्यात संघातील काही सदस्यांनी एका पुस्तक अनावरण कार्यक्रमात सहभाग घेतला नि नंतर संघात कोरोनाची एंट्री झाली होती. त्यामुळे मालिका अर्धवट सोडावी लागली होती. या पार्श्वभूमीवर खेळाडूंना अधिक दक्षता घेण्याची गरज असल्याचे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले..
संघातील दोन वरिष्ठ खेळाडू बिनधास्तपणे इंग्लंडमध्ये फिरत असल्याने ‘बीसीसीआय’ची चिंता वाढलीय. ‘बीसीसीआय’ने सर्व खेळाडूंना कोरोना नियमांचे पालन करण्यासह गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मनाई केली आहे. यूकेमध्ये कोविड संकट कमी झाले असले, तरी भारतीय खेळाडूंना सावध राहावे लागेल, असे ‘बीसीसीआय’चे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले.