SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोण होणार राष्ट्रपती..? भाजप व विरोधी पक्षांकडून उमेदवार जाहीर..!!

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झालेला असताना, राष्ट्रीय राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय.. देशाच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. दुसरीकडे विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरवले आहे.

विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. पुढील राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, 29 जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आतापर्यंत अनेकांनी अर्ज दाखल केले असले, तरी भाजपने आपला उमेदवार जाहीर केलेला नव्हता..

Advertisement

राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या नावावर विचारमंथन करण्यासाठी पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी बैठकीस उपस्थित होते.

बैठकीनंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की “संसदीय मंडळाच्या बैठकीत भाजपने सर्व घटक पक्षांसोबत राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा केली. बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाली. त्यातून द्रौपदी मुर्मू यांना ‘एनडीए’चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषीत करण्यात आलं. आम्ही विरोधी पक्षांशीही सल्ला-मसलत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातून काही निष्पन्न झाले नाही..”

Advertisement

द्रोपदी मुर्मू कोण..?

ओडिसातील मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात ‘संथाल’ या आदिवासी जमातीत द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला. सुरुवातीला शिक्षिका असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनी नंतर राजकारणात उडी घेतली. 2000 व 2009 मध्ये त्या भाजपकडून आमदार झाल्या. आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. बिजू जनता दल, भाजप सरकारमध्ये त्या वाणिज्य व वाहतूक मंत्री होत्या. नंतर मत्स्य विभागाच्या मंत्री झाल्या. 2015 मध्ये झारखंडच्या पहिल्या राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

Advertisement

विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा

विरोधी पक्षाकंडून राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी करण्यास शरद पवार, फारुख अब्दुल्ला यांनी नकार दिल्यानंतर माजी मंत्री यशवंत सिन्हा यांचं नाव समोर आलंय. शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीला देशभरातील विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते..

Advertisement

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ संख्याबळाच्या आधारावर भक्कम स्थितीत आहे. ‘बीजेडी’ किंवा आंध्र प्रदेशातील सत्ताधारी ‘वायएसआर काँग्रेस’ने पाठिंबा दिल्यास ‘एनडीए’चा उमेदवार विजयी होणार, हे नक्की.!

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement